बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मला "व्हाईट हाऊस'चं पहिलं दर्शन घडलं ते १९८४ मध्ये. मी कॉलेजमधून नुकताच पास झालो होतो आणि न्यूयॉर्कमधल्या सिटी कॉलेजच्या "हार्लेम' प्रभागात कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम पाहू लागलो होतो. राष्ट्राध्यक्ष रेगन यांचा विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत कपात करण्याचा विचार होता, त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांत जागृती निर्माण करण्याचं काम मी हाती घेतलं होतं. या विद्यार्थ्यांमध्ये बरेच नेते कृष्णवर्णीय, पूर्व युरोपियन होते. अशा सर्वांना एकत्र करून आमच्या मागण्या न्यूयॉर्कच्या कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळापुढं मांडणं, या कामगिरीत मी गुंतलो होतो.
"व्हाईट हाऊस'ची ही भेट तशी धावतीच होती. आमचा बराच वेळ "रेबर्न बिल्डिंग'मधल्या या पॅसेजमधून त्या पॅसेजमध्ये भटकण्यात आणि "कॅपिटॉल हिल'मधल्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी करून घेण्यातच गेला. बरेचसे कर्मचारी माझ्याच वयाचे होते, काही थोडेसेच जण वयस्कर वाटत होते. शेवटी आमचा घोळका "मॉल' आणि "वॉशिंग्टन स्मारका'कडे वळला आणि आहा ! आम्हाला समोर "व्हाईट हाऊस' दिसलं. आधी औत्सुक्याने, मग कौतुकाने आणि नंतर टक लावून आम्ही "व्हाईट हाऊस' बघितलं. "पेनसिल्व्हानिया अव्हेन्यू'मधल्या "मरीन्स'च्या सुरक्षा चौकीमागेच "व्हाईट हाऊस'चं मुख्य प्रवेशद्वार होतं, पदपथावरून पादचारी चालले होते तर रस्त्यावरून वाहनांची रहदारी सुरूच होती. मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं. एवढी भव्य वास्तु आणि तिला लागून असलेली माणसांची - वाहनांची वर्दळ ! आम्हीसुद्धा प्रवेशद्वाराच्या किती जवळ होतो, तिथून वळून दुसऱ्या बाजूला गेलो तेव्हाही "व्हाईट हाऊस'ची दुसरी बाजू, तिथलं "रोझ गार्डन' आणि निवास दृष्टीस पडले. "व्हाईट हाऊस'चा हा मोकळेढाकळेपणा हा आमच्या लोकशाहीवर असलेल्या विश्वासाचं प्रतीकच भासला. आमचे नेते हे आमच्यासारख्या सर्वसामान्यांमधूनच आलेले आहेत, त्यांची कायद्याशी बांधिलकी आहे आणि त्यांना आम्हा सर्वसामान्यांची एकमुखाने मान्यता आहे, हे मला जाणवलं. हे साल होतं १९८४ !
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment