Monday, January 5, 2009

"अमेरिकन' मन कसं कळणार?

बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
१९६० च्या दशकाशी माझी खास प्रकारे नाळ जोडलेली आहे, असं मला नेहमी वाटतं. एक प्रकारे जणू हा माझाच काळ होता. संमिश्र विवाहाचे मी एक अपत्य ! समाजात उलथापालथ झाली नसती तर त्याला कुठलीही संधी मिळाली नसती. पण या घटनांचा परिणाम जाणवण्याचं माझं वयच नव्हतं. हवाई बेटं आणि नंतर इंडोनेशियात माझं बालपण गेलं. मला तेव्हाचं "अमेरिकन' मन कसं कळणार ? माझी आई खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवादी होती, तिच्याकडून माझं थोडफार प्रबोधन झालं, माझ्या जाणीवा घट्ट झाल्या - हीच माझी तत्कालीन घटनांची जाण असं म्हणता येईल. समान नागरी कायद्याच्या चळवळीमुळे तिच्या भूमिकेत ठामपणा आला. आलेल्या संधीचं सोनं करायचं ते सहनशीलता, समानता, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करूनच - हे तिनेच माझ्यावर बिंबवले.

१९६० च्या दशकातल्या घटनांची माझ्या आईला असलेली जाण तशी मर्यादितच होती. एकतर ती अमेरिकेच्या मुख्य भूमीपासून लांब - हवाई व नंतर इंडोनेशियात राहत होती, आणि ती थोडीशी स्वप्नाळूही होती. कृष्णवर्णीयांचे प्रश्न असोत वा स्त्रीमुक्‍तीवादाचा विचार असो, कुठलयाही प्रश्नावर आक्रस्ताळेपणा करून मत व्यक्‍त करण्याचा तिचा स्वभावच नव्हता. स्वातंत्र्यवादाच्या तिच्या कल्पना १९६७ पूर्व काळातच कुपीबंद झाल्या होत्या. त्या कालकुपीत अंतरिक्ष कार्यक्रम, शांतिसैनिक, स्वातंत्र्यवादी प्रचारफेऱ्या आणि महालिया जॅक्‍सन आणि जोन बेझ अशा नेत्यांबाबतच्या स्वप्नाळू प्रतिमा तिने जपल्या होत्या.
(क्रमशः)
-------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)

No comments: