Showing posts with label barack obama marathi book. Show all posts
Showing posts with label barack obama marathi book. Show all posts

Wednesday, January 14, 2009

"व्हाईट हाऊस'चं पहिलं दर्शन...

बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मला "व्हाईट हाऊस'चं पहिलं दर्शन घडलं ते १९८४ मध्ये. मी कॉलेजमधून नुकताच पास झालो होतो आणि न्यूयॉर्कमधल्या सिटी कॉलेजच्या "हार्लेम' प्रभागात कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम पाहू लागलो होतो. राष्ट्राध्यक्ष रेगन यांचा विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत कपात करण्याचा विचार होता, त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांत जागृती निर्माण करण्याचं काम मी हाती घेतलं होतं. या विद्यार्थ्यांमध्ये बरेच नेते कृष्णवर्णीय, पूर्व युरोपियन होते. अशा सर्वांना एकत्र करून आमच्या मागण्या न्यूयॉर्कच्या कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळापुढं मांडणं, या कामगिरीत मी गुंतलो होतो.

"व्हाईट हाऊस'ची ही भेट तशी धावतीच होती. आमचा बराच वेळ "रेबर्न बिल्डिंग'मधल्या या पॅसेजमधून त्या पॅसेजमध्ये भटकण्यात आणि "कॅपिटॉल हिल'मधल्या कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी करून घेण्यातच गेला. बरेचसे कर्मचारी माझ्याच वयाचे होते, काही थोडेसेच जण वयस्कर वाटत होते. शेवटी आमचा घोळका "मॉल' आणि "वॉशिंग्टन स्मारका'कडे वळला आणि आहा ! आम्हाला समोर "व्हाईट हाऊस' दिसलं. आधी औत्सुक्‍याने, मग कौतुकाने आणि नंतर टक लावून आम्ही "व्हाईट हाऊस' बघितलं. "पेनसिल्व्हानिया अव्हेन्यू'मधल्या "मरीन्स'च्या सुरक्षा चौकीमागेच "व्हाईट हाऊस'चं मुख्य प्रवेशद्वार होतं, पदपथावरून पादचारी चालले होते तर रस्त्यावरून वाहनांची रहदारी सुरूच होती. मला आश्चर्य आणि कौतुक वाटलं. एवढी भव्य वास्तु आणि तिला लागून असलेली माणसांची - वाहनांची वर्दळ ! आम्हीसुद्धा प्रवेशद्वाराच्या किती जवळ होतो, तिथून वळून दुसऱ्या बाजूला गेलो तेव्हाही "व्हाईट हाऊस'ची दुसरी बाजू, तिथलं "रोझ गार्डन' आणि निवास दृष्टीस पडले. "व्हाईट हाऊस'चा हा मोकळेढाकळेपणा हा आमच्या लोकशाहीवर असलेल्या विश्वासाचं प्रतीकच भासला. आमचे नेते हे आमच्यासारख्या सर्वसामान्यांमधूनच आलेले आहेत, त्यांची कायद्याशी बांधिलकी आहे आणि त्यांना आम्हा सर्वसामान्यांची एकमुखाने मान्यता आहे, हे मला जाणवलं. हे साल होतं १९८४ !
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)

Friday, January 9, 2009

सवयीने मी माझा हात राष्ट्राध्यक्षांच्या...

बराक ओबामा यांच्या पुस्तकाची मराठी आवृत्ती लवकरच "अमेय प्रकाशन'तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील निवडक भाग...
-------------------------------------------------------
मी हसलो आणि राष्ट्राध्यक्षांना दरवाजापर्यंत सोडायला गेलो. तेवढ्यातल्या तेवढ्यात निवडणूक मोहिमेतले काही किस्सेही त्यांना ऐकवायची संधी मी सोडली नाही. मी त्यांच्याशी बोलण्यात अगदी पुरता रंगलो होतो. इतक्‍यात आजूबाजूला विशेषतः सुरक्षा रक्षकांमध्ये काही तरी खुसपुस मला जाणवली. पाह्यलं, तर सुरक्षा रक्षकांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव होते. काही तरी विचित्र बघितल्यासारखे ! मला कळेचना, सगळं छान सुरू असताना या सुरक्षा रक्षकांचं काय बिनसलं असावं?

क्षणभर मीही विचार केला आणि एकदम काय घोळ झालाय, ते माझ्या लक्षात आलं. बोलता बोलता, सवयीने मी माझा हात राष्ट्राध्यक्षांच्या... अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या खांद्यावर टाकला होता. आणि म्हणून सारेजण काहीसे अचंबित... काहीसे त्रस्त, बेचैन आणि काहीसे वैतागलेले दिसत होते.

ही माझी अगदी नेहमीची सवय ! बोलता बोलता चटकन्‌ खांद्यावर हात टाकण्याची ! खरं सांगायचं, तर माझ्या या सवयीमुळे मला भरपूर मित्रही मिळालेत. पण...

पण इथं साक्षात्‌ राष्ट्राध्यक्ष होते, हे मी क्षणभर विसरूनच गेलो होतो.
(क्रमशः)
------------------------------------------------------
(अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा)